मुंबई १८ जून २०२३ : काल शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली. यावेळी समाधीजवळ आंबेडकर नतमस्तक झाले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेले असताना हा प्रकार घडल्यामुळे, टीकेचे सूर उमटू लागले आहोत.
प्रकाश आंबेडकरांच्या या कृतीवर शिवसेना आणि भाजपने जोरदार टीका केलीय, तर आंबेडकरांच्या या कृतीमुळे उद्धव ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, मला वाटते अशा प्रकारच्या कृती या दुर्दैवी आहेत. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा खुलेआम अपमान करण्याचे काम होतंय. यामध्ये उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन १९ जूनला होतोय, या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा म्हणून, ही सलामी दिली आहे का? असेही दरेकर म्हणाले.
तर दुसरीकडे हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या आणि संभाजी महाराजांची हत्त्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर, प्रकाश आंबेडकर यांनी माथा टेकून शिवभक्तांना दुखावले आहे. त्यांनी शिवभक्तांच्या शिवभक्तीला आव्हानच दिले आहे, असे हिंदू महासंघ मानतो. राज्यातील वातावरण बिघडण्याआधी, शिवभक्त चिडण्याआधीच सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावर कडक कलम लावून त्यांना अटक करावी अशी आमची आमची भूमिका असल्याचे हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी म्हटले आहे.
न्यूज अन कट प्रतिनिधी- अनिल खळदकर