प्रकाश आंबेडकरांनी घेतली संविधान चौकात आशा व गटप्रवर्तक यांची भेट

नागपूर, ९ फेब्रुवारी २०२४ : आज नागपूरमध्ये आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी राज्य शासनाने घोषित केलेल्या निर्णयाचा जी आर काढावा यासाठी आंदोलन केले. यावेळी संविधान चौकात चालू असलेल्या आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर यांनी भेट देऊन आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे प्रश्न समजून घेतले व शासनाशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्न करणार असे त्यांनी आश्वासन दिले.

१२ जानेवारीपासून राज्यातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक शासनाने परत जी आर काढावा या मागणीसाठी संपावर आहेत. मंत्रिमंडळाच्या वारंवार बैठका होऊन सुद्धा आमच्या प्रश्नावर सरकार दुर्लक्ष करीत आहेत, असे आशा वर्कर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस साजरा करण्याकरिता महाराष्ट्रातून किमान ५० हजार आशा वर्कर व गटप्रवर्तक त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना गुलाबाचे फुल देणार आहे आणि जोपर्यंत राज्य सरकार जीआर काढत नाही तोपर्यंत त्यांच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र आशा -गटप्रवर्तक कृती समितीने घेतलेला आहे.

मागील संपाच्या दरम्यान आशा वर्कर व गटप्रवर्तक यांची मानधन कपात झाली असून राज्याचा निधी सुद्धा आजपर्यंत वाटप करण्यात आलेला नाही. मागील संप हा फक्त २३ दिवस चालला. परंतु पूर्ण ऑक्टोबर महिन्याचे मानधन कपात करण्यात आले. इतर निधी सुद्धा आशा वर्करला देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो असे आशा वर्करचे म्हणणे आहे. कार्यक्रमाला प्रामुख्याने राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकरसह शेकडो आशा वर्कर व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या मागण्या

१) आशा व सुपरवायजर यांना ५ हजार दिवाळी बोनस द्या.
२) गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.
३) आशा – सुपरवायजर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्री सक्ती करू नये.
४) आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन देण्यात यावे.
५) आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे समायोजित करण्यात यावे.
५) सी एच ओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्करला आरोग्य वर्धिनीचा निधी मेडिकल ऑफिसरच्या सहीने देण्यात यावा.
६) आशा सुपरवायझर यांना १५०० रु. महिना आरोग्य वर्धीनी निधी देण्यात यावा.
७) शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये.
८) लाभार्थीची माहिती सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मागवण्यात यावी. इतर वेळेस मॅसेज किंवा फोन करू नये.
९) डेंग्यू, क्षयरोग, कुष्ठरोग कामाचा २०० रू. रोज देण्यात यावा.

न्यूज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा