प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार, वंचित आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे केले आवाहन

अकोला, १३ ऑगस्ट २०२३ : लोकसभा निवडणुका जसजश्या जवळ येत आहेत तशी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याची तयारी सर्वच मोठ्या पक्षांनी सुरू केली आहे.एकीकडे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर दुसरीकडे भाजपने एनडीएची वज्रमुठ आवळली आहे. त्यामुळे देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठे घमासान पाहायला मिळणार आहे. एकीकडे बड्या आणि प्रस्थापित राजकीय पक्षांनी ही मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच दुसरीकडे इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या गटासोबत युती असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणुका कधीही लागू शकतात यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेसाठी आपली उमेदवारी अकोल्यातून जाहीर केली आहे. आपण अकोल्यातून लढणार आहोत. भाजप आणि आरएसएसच्या उमेदवाराला पराभूत करून निवडणुका जिंका, असे आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

देशातील परिस्थिती बदलायची असेल तर भाजपचा पराभव केलाच पाहिजे. म्हणून वंचित आघाडीच्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आंबेडकर यांची उध्दव ठाकरे गटासोबत युती आहे. या युतीची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. त्याआधीच प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून त्यांची उमेदवारी घोषित केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी गेल्यावेळी सोलापूर आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघात त्यांचा पराभव झाला होता. यावेळी त्यांना चांगली मते मिळाली होती. त्यांनी सोलापूर मध्ये जास्त मते घेतल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा