प्रकाश आंबेडकर यांची औरंगजेबाच्या समाधीला भेट, औरंगाबाद हि देशाची दुसरी राजधानी जाहीर करावे असे केले आवाहन

5

औरंगाबाद १७ जून २०२३: महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेची नवीन मोठी बातमी समोर आलीय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेले असताना त्यांनी औरंगाबादला जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट का दिली? असा प्रश्न उपस्थित होतोय.

औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद येथे औरंगजेबाची समाधी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबादमध्ये दाखल होत औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्यानंतर, तिथे उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले इथे आणखी एक ऐतिहात्सिक वास्तू आहे, ती वास्तूदेखील बघायला मी आलोय.

औरंगजेबाला कशाला शिव्या घालताय? औरंगजेब ५० वर्षे राज्य करुन गेला ना? इतिहास तुम्ही मिटवणार आहात का? औरंगजेबाचे राज्य का आले? तर बाबासाहेबांनी याबाबत सरळ सांगितले आहे की, जयचंद सारख्या गद्दारामुळे औरंगजेबाने देशावर राज्य केले. त्या जयचंदाला शिव्या घाला, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. औरंगाबाद ही दुसरी राजधानी व्हावी ही तुघलकापासून ची मागणी आहे. लोकांचा दुसऱ्या राजधानीला विरोध असेल तर माझे म्हणणे आहे की, महाराष्ट्राने या साठी पुढाकार घ्यावा व केंद्र सरकारला सांगावे की, औरंगाबाद, खुलताबाद हा भाग भारताची दुसरी राजधानी म्हणून जाहीर करावी,असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

औरंगजेबाचे व्हिडीओ स्टेटसला ठेवले म्हणून राज्यात वाद निर्माण झालाय याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता, माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर मी दोन दिवसांत प्रकरण निपटून टाकले असते. वादाचा विषय होऊ देता म्हणून तो होतो, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा