मुंबई, २७ जानेवारी २०२३ :प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची चार दिवसांपूर्वीच युती झाली. या दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचेच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या विधानावरून सध्या गदारोळ सुरु आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत, प्रकाश आंबेडकर यांना एक सल्ला देखील दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी मी सहमत नाही. चार दिवसांपूर्वीच शिवसेना आणि वंचित आघाडीची युती झाली आहे. पण, प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल अशा प्रकारची विधाने करणे आम्हाला मान्य नाही. शरद पवार महाराष्ट्र आणि देशाचे उत्तुंग नेते आहेत. शरद पवार भाजपाबरोबर आहेत, असे म्हणणे म्हणजे त्यांच्या कारकीर्दीवर मोठा आरोप आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
- आंबेडकरांनी शब्द जपून वापरावे
पुढे ते म्हणाले, शरद पवार भाजपाचे असते, तर महाराष्ट्रात अडीच वर्षापूर्वी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले नसते. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरायला हवेत, असा सल्ला देखील संजय राऊतांनी यावेळी दिला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.