मुंबई, ३ नोव्हेंबर २०२२ : शिवसेने नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे अनेक आमदार शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेले. त्यात बंडात प्रताप सरनाईक देखील सामील होते. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती. यानंतर सरनाईक यांचा विषय तात्पुरता बाजूला झाला. पण सुरुवातीला शिवसेनेचे नेते त्यांची बाजू मांडत होते, पण यानंतर शिंदे गटासोबत गेल्याने ईडीची कारवाई थांबली की काय, असा सवाल शिवसेनेतून विचारला जात होता. पण आत्ता पुन्हा सरनाईक अंमलबजावणी संचालनालयान ED च्या रडारवर आलेत.
मिळालेल्या माहितीनुसार एनएसईएल घोटाळ्याच्या संदर्भात आता ईडी कारवाई करण्याची शक्यता आहे. सरनाईकांची संपत्ती जप्त करण्यासाठी ED ने हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी ED ने परवानगी मिळविली असून सरनाईकांची ११ कोटींची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. यामध्ये ठाण्य़ातील दोन फ्लॅट आणि मीरारोडमधील कोट्यवधी किंमतीचा प्लॉटचा ही सामावेश असणार आहे.
NSEL घोटाळा प्रकरण
NSEL प्रकरणात त्यांचे संचालक, प्रमुख अधिकारी, २५ डिफॉल्टर आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या (NSEL)प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले, बनावट कागदपत्रं तयार केली, खोटी खाती तायर केली आणि त्याद्वारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. १३ हजार गुंतवणूकदरांची ५,६०० कोटींची फसवणूक केल्याची माहिती ईडीने दिली आहे.
दरम्यान, नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बिल्डर योगेश देशमुख याला अटक करण्यात आली होती. सुमारे ५६०० कोटींच्या सावकारीशी संबंधित हे प्रकरण आहे. योगेश देशमुख याला कल्याण येथून ६ एप्रिल २०२१ रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक आणि योगेश देशमुख यांच्यात आर्थिक संबंध असून टिटवाळ्याजवळ गुरवली येथील ७८ एकर जागा देखील प्रताप सरनाईक यांनी देशमुख यांच्याकडून खरेदी केल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी आणि सीबीआयनं १८ मे २०२१ रोजी एकाच वेळी छापेमारी केली होती. आत्ता पुन्हा सरनाईक ED च्या रडारवर आलेत.
प्रताप सरनाईक शिंदे फडणवीस सरकार मध्ये असूनही आत्ता ईडीच्या रडावर आले आहेत. दरम्यान, हीच कारवाई टाळण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी बंडावेळी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. पण तरीही त्यांना दिलासा मिळालेला नाही, पण सत्ताधारी असो किंवा विरोधी कारवाई होणार असे असेल तर सरनाईक यांच्या कारवाई नंतर केंद्रिय यंत्रणाची भूमिका स्पष्ट होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे