दुबई २३ सप्टेंबर २०२४ : जगभरात नुकत्याच धूमधडाक्यात पार पडलेल्या गणेशोत्सवाचा आनंद गणेश भक्तांनी घेतलाच आहे. आपल्या घरातील बच्चे कंपनीचा देखील उत्साह अजूनही ताजा असानाच त्यांना स्वतः गणेशोत्सव साजरा करता यावा, आपल्या परंपरा आणि आपली संस्कृती त्यांना कळावी यासाठी ‘प्रथा’ या दुबईस्थित संस्थेने पहिल्यांदाच दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी बाल गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उत्सवात सुमारे ६० मुला-मुलींनी सहभाग घेत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला.
सुरुवातीला गणेशोत्सवाचा इतिहास, महत्त्व आणि परंपरा याबद्दल समजावून सांगण्यात आले. मुला मुलींना वेगवेगळ्या संघात विभागण्यात आले जसे की सजावट, पूजा, मिरवणूक, ढोल ताशा इत्यादी. त्यानंतर बालगणेशाचे चित्र रंगवण्यासाठी देण्यात आले. नंतर जंगल या विषयावर सजावट करण्याचे ठरले असल्याने मुलांनी चित्रांच्या साहाय्याने झाडे, पाने आणि जंगल साकारले. सोबतच मुलांना बाप्पाचे आवडते मोदक बनवण्याची संधी देण्यात आली, ज्यात त्यांना साच्याच्या साहाय्याने मोदक बनवायचे होते. मुलांनी ते अतिशय आवडीने बनवले.
त्यानंतर आली बाप्पाच्या आगमनाची वेळ आणि त्यासाठी सज्ज होते त्रिविक्रम बालमित्र लहान मुलांचे ढोल, ताशा पथक ज्यांनी अतिशय दिमाखदार वादन करून उत्साही माहोल बनवला. गणपती बाप्पाची पूजा करून आपल्या हातांनी बनवलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला ज्यातून मुलांना “अर्पण करणे” ह्या संज्ञेचा अर्थ समजला. ते झाल्यावर मुलांनी “ओम गं गणपतये नमः” हा जप आणि ध्यानधारणा केली. ही देखील एक महत्त्वाची शिकवण होती. त्यानंतर मुलांपैकी अनेकांनी बाप्पा ची गाणी म्हटली, काहींनी मजेदार गोष्टी सांगितल्या.
खिरापत ह्या मजेदार संज्ञेची ओळख देखील मुलांना व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र बसून मोदक आणि न्याहारी याचा आस्वाद घेतला. दिवसभराच्या या सगळ्या धावपळीनंतर वेळ होती महाआरतीची. गणेशोत्सवाचा महत्त्वाचा हेतू हा असतो की सर्वांनी एकत्र यावे आणि त्यासाठीच महाआरती आयोजित केली गेली ज्यात सर्व मुले आणि त्यांचे पालक सहभागी झाले. त्यानंतर ढोल ताशा च्या मिरवणुकीने गणपती बाप्पाच्या छोट्या मुर्त्यांचे विसर्जन स्वतः मुलांनी कले. विसर्जनावेळी मुलांचे डोळे देखील पाणावलेले दिसले.
पालकांनी शेवटी अभिप्राय देताना नोंदवले की मुले घरी जाताना खूप चांगली शिकवण घेवून जात आहेत आणि त्यासाठी त्यांनी प्रथाचे मनपूर्वक आभार मानले. यावेळी तीन पिढ्या उपस्थित होत्या. मुलांना परदेशात देखील आपण आपल्या संस्कृतीची आणि चालिरीतींचा विसर पडू देत नाही, हे अतिशय वाखाणण्याजोगे असून ‘प्रथाने’ हे अविरत चालू ठेवावे अशी अपेक्षा एका आजींनी व्यक्त केली.
हा संपूर्ण कार्यक्रम नेटक्या पद्धतीने पार पडावा यासाठी प्रियांका पाटील, श्रद्धा पाटील, सिद्धेश पाटील, भूषण तिगोटे, श्रद्धा कांबळे, किरण कांबळे, मुकुल जोशी, ज्योती सांगळे, अंकिता पाटील, हर्षला देसाई आणि प्रियांका शेवाळे या प्रथाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तर या उत्सवाची अनोखी कल्पना सत्यात उतरवणारे ‘प्रथा’चे संस्थापक अध्यक्ष सागर पाटील असून येणाऱ्या काळात प्रथा असेच नवनवीन उपक्रम NRI मुलांसाठी घेऊन येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनीधी : वैभव वाईकर