कर्जत, दि. १ जुलै २०२०: न्यूज अनकटने दिलेल्या बातमी नंतर खांडवी येथील कै. काकासाहेब मच्छिंद्र तापकीर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण पोपट तापकीर याला कर्जत पोलिसांनी सापळा रचून करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथून रात्री साडेबारा वाजता अटक केली. न्यूज अनकटने ही बातमी प्रकाशित केल्यानचे त्याचा इम्पैक्ट पडल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
खांडवी येथील खून प्रकरणातील अकरा आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०७ आणि इतर ९ कलमे लावून कर्जत पोलिसांनी २५ मे २०२० रोजी गुन्हा दाखल करून घेतला होता. त्यानंतर दहा आरोपी कर्जत पोलिसांनी अटक केले. परंतु या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण पोपट तापकीर हा गेली ३५ दिवस फरार होता.
प्रवीण पोपट तापकीर हा सौर ऊर्जेचे ठेके घेतो. फरार काळात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सौर ऊर्जेच्या ठेकेदारीची कामे करत होता. सौर ऊर्जेच्या कामाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे तो असल्याचे कर्जत पोलिसांना खबऱ्याकडून समजले आणि कर्जत पोलिसांनी दिनांक २९ जून २०२० रोजी रात्री साडेबारा वाजता चिखलठाण येथे सापळा लावून त्याला अटक केली.
कर्जतचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आणि पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दरम्यान कै. काकासाहेब मच्छिंद्र तापकीर यांच्या कुटुंबीयांनी २ जुलै २०२० पासून कर्जत पोलिसांना दिलेली प्राणांतिक उपोषणाची नोटीस मागे घेण्यात येत आहे. या सर्व आरोपीवर कर्जत पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी देखील केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष