प्रयागराज, २७ ऑक्टोबर २०२२: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. आज गुरुवारी पहाटे प्रयागराज येथील संगम शहरातील हंडिया टोल प्लाझाजवळ हा अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.
प्रयागराज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी सकाळी ६.४० वाजता एक तवेरा कार विजेच्या खांबाला धडकली. कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये चार महिलांसह एका चिमुकल्याचा समावेश आहे. हे सर्व शिवगड सोरांव येथील रहिवासी आहेत. सर्वजण प्रयागराजहून विंध्याचल दर्शनाला जात होते. दरम्यान, जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन युद्धपातळीवर मदतकार्य करण्याचे आणि जखमींना योग्य उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत मुख्यमंत्री योगी यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.