Motherhood After Cancer: एकेकाळी कर्करोगाचे निदान म्हणजे जीवनातील अनेक आशांवर पाणी फिरल्यासारखे होते, विशेषतः स्त्रियांसाठी, कारण मातृत्वाचे स्वप्न धूसर होत असे. मात्र, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. डॉ. विनोद भारती, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या मते, आता कर्करोगावर उपचार घेतलेल्या स्त्रियांनाही आई होणे शक्य झाले आहे. स्त्रीबीज जतन करण्याच्या (एग फ्रीझिंग) तंत्रज्ञानामुळे तरुण वयात कर्करोगाचा सामना केलेल्या स्त्रिया उपचारानंतरही यशस्वीरीत्या गर्भधारणा करू शकतात.
वाढते वय, धावपळीचे आयुष्य, मानसिक ताण, अनियमित कामाच्या वेळा, धूम्रपान, मद्यपान आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम यांसारख्या कारणांमुळे सध्या अनेक जोडप्यांना गर्भधारणेत अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत ‘टेस्ट ट्यूब बेबी’ किंवा ‘आयव्हीएफ’ (IVF) हे एका वरदानापेक्षा कमी नाही. या प्रक्रियेत, आईच्या शरीरातील बीज आणि वडिलांच्या शरीरातील वीर्य यांचा प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या संगम घडवून आणला जातो आणि तयार झालेले भ्रूण गर्भाशयात सोडले जाते. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया नियंत्रित वातावरणात पार पडते.
आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे अनेक अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही गर्भधारणा शक्य झाली आहे. वारंवार अपयशी ठरलेल्या गर्भपाताच्या केसेस, वयस्क जोडपी, जनुकीय विकृती असलेले पालक, सिंगल पालक तसेच शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांची गुणवत्ता निकृष्ट असणे अशा अनेक समस्यांवर आयव्हीएफ उपयुक्त ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान आशेचा किरण बनले आहे, कारण ते उपचारानंतरही पालकत्वाचा आनंद अनुभवू शकतात.
‘पालकत्व ही केवळ एक जबाबदारी नसून, आनंद, आशा आणि प्रेम गुंफलेली एक भावना आहे,’ असे डॉ. भारती नमूद करतात. आयव्हीएफ पद्धत या भावनांना हक्काचे स्थान देत आहे, ज्यामुळे अनेक जोडप्यांचे मातृत्वाचे स्वप्न साकार होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे












































