सातारा – प्रेमप्रकरण कळाल्यानंतर सतत शिवीगाळ करणाऱ्या वडिलांचा मुलीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची घटना आकले (ता. सातारा) येथील गोसावी वस्तीत घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी अल्पवयीन मुलगी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी विठ्ठल धर्मू जाधव (रा. आकले, ता. सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकले येथील गोसावी वस्तीतील एका अपंगाचा बुधवारी रात्री झोपेत असताना खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्ती अपंग असल्याने खून कोणी व का केला, याचा तपास करण्याचे आव्हान सातारा तालुका पोलिसांसमोर होते.
दरम्यान, मृत व्यक्तीला बाहेरच्या कोणी नव्हे तर मुलीने प्रियकराच्या मदतीने मारल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, दोघांनी खुनाची कबुली दिली. वडिलांना प्रेमप्रकरणाची माहिती झाल्याने ते सतत मारहाण करायचे.
शिवीगाळ करून अपमानित करत होते. गेल्या १५ वर्षांपासून आई बेपत्ता आहे. भाऊ परगावी गेल्याने मी व वडील असे दोघेच घटनेच्या दिवशी घरात होतो. मी प्रियकराला घरी बोलावून घेतले आणि मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वडिलांचा गळा स्कार्फने आवळून खून केल्याची धक्कादायक कबुली मृताच्या मुलीने दिली. पोलिसांनी दोघांच्या वयाची खात्री केली. त्यानंतर पुढील प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाण्यात सुरू होती. पोलीस निरीक्षक सजन हंकारे तपास करत आहेत.