वेध निवडणुकांचे

14 जुलै, 2022 : आता निवडणुकांचे वेध लागले आहेत. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप सगळ्या पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक जण आपापली रणनीती आखून पुढे पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे.

याची सुरुवात शिवसेनेकडून झाली आहे. बंडखोरी नंतर आता शिवसेनेत कुणी उरले नाही. जी उरली सुरली शिवसेना आहे, ती आता जोमाने कामाला लागली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला अत्यंत जोशात काम करण्याची गरज आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी निर्धार यात्रा सुरु केल्याने आता पुन्हा शिवसेनेत जोश भरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण स्वत: उद्धव ठाकरे यांनी आता हे शिवधनुष्य हाती घेतलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना किती चमत्कार घडवते हे पहावं लागेल.हे झालं शिवसेनेचं. आता नंबर राष्ट्रवादीचा.

राष्ट्रवादीने आता निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. त्यात आता शरद पवार स्वत: जातीने लक्ष घालून निणडणुकीचे प्लॅनिंग करत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने एकत्र निवडणुक लढवावी, असा मनसुबा शरद पवारांनी बोलून दाखवला. पण त्यात उद्घव ठाकरेंनी विशेष लक्ष घातले नाही. यावरुन त्यात त्यांना रस दिसत नाही, हे दिसून आले आहे. पण त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही तयारीला लागा, कोणी बरोबर असो किंवा नसो, असे आदेश शरद पवारांनी दिले आहेत.

कॅाग्रेसमध्ये अशीही नाराजी आहे. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे.

त्यामुळं आता महाविकास आघाडी तुटणार की राहणार याकडे तर सगळ्यांचेच लक्ष आहे, पण निवडणुकची रणनीती काय असेल, आणि त्यातून काय निष्पन्न होईल, हे पहाणं गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा