अंबाला. २८ जुलै २०२०: फ्रान्सहून येणार्या पाच राफेल विमानांची पहिली तुकडी २९ जुलै रोजी भारतात पोहोचेल. ही पाच राफेल विमान ७ हजार किलोमीटर अंतर पार करून भारतात पोहचतील. अंबाला येथील भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात या राफेल विमानांचा समावेश होणार आहे. अंबाला हवाई तळही राफेलच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे.
लोकांची राफेल विमाने भारतात येताना पाहण्याची गर्दी बघता अंबाला हवाई तळावरची सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. आता अंबाला एअरबेसच्या ३ किमीच्या परिघाला ड्रोन झोन घोषित करण्यात आले आहे. एअरबेसच्या तीन किलोमीटरच्या आत ड्रोनवर पूर्णपणे बंदी घातली जाईल. जर कोणी त्याचे उल्लंघन केले तर त्यावर कारवाई केली जाईल.
वास्तविक, एकीकडे राफेलसाठी एअरबेस आधीच सज्ज झाला आहे, तर आता हवाई दल आणि अंबाला प्रशासनाने एअरबेसच्या ३ किमीच्या परिघाला ड्रोन झोन म्हणून घोषित केले आहे. अंबाला येथील एअरबेस संदर्भातील बंदोबस्ताबाबतची माहिती अंबाला छावणीचे डीएसपी राम कुमार यांनी दिली. अंबालासाठी ही अभिमानास्पद बाब आहे आणि जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
चीन सीमेपासून सुमारे ३०० किमी अंतरावर अंबाला एअरबेस येथे लढाऊ विमान राफेल तैनात केले जाईल. यामुळे,अंबाला एअरबेसमध्येही राफेलबाबत जोरदार बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने अंबाला एअरबेससंदर्भात कठोर पावले उचलली आहेत. फ्रान्सबरोबर २०१६ मध्ये ३६ राफेल विमानांवर एक करार झाला होता. यानंतर, राफेल विमानांची ही भारतातील पहिली आयात आहे. तथापि, कोरोनाच्या संकटामुळे विमानाच्या पुरवठ्यात थोडा विलंब झाला. करारानुसार २ वर्षात भारताला ३६ राफेल विमान मिळणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी