जळगाव येथील ‘कुमार साहित्य संमेलनाच्या’ तयारीस वेग, निवड फेरी ८ डिसेंबरला

39

जळगाव ४ डिसेंबर २०२३ : विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या कुमार साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला असून संमेलनाची निवड फेरी येत्या ८ डिसेंबर रोजी स.९:०० वा. सुयोग कालनी जळगाव येथे होत आहे. या निवड प्रक्रियेत सर्व साहित्य प्रकाराबरोबरच संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपला संपूर्ण परिचय, स्व-रचित कविता, कथा, इतर सहभागी कार्यक्रम, स्पर्धा ,वर्तमानपत्रातील बातम्या, प्रमाणपत्रे अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांच्या शिफारस पत्रासह मुलाखतीस येताना सोबत आणावी. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्ष पूर्ण होत आहे. या संकल्पनेवर हे संमेलन आधारित असणार आहे. ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवड फेरीत सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्हा आणि शहरातील एकूण ३०० शाळांशी संपर्क साधण्यात आला असून सर्व शाळांमधून आणि समाजातील सर्व स्तरामधून उस्फूर्त असा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हे संमेलन यशस्वी व्हावे यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी सकारात्मक असे वातावरण निर्मिती व्हावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संमेलनामध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. साहित्यात रुची असलेल्या साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी ९८९०४४०४०२, ९७६६९८८१७३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील