ऐतिहासिक उत्सवासाठी देश सज्ज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार

12

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट २०२३ : देशाच्या प्रत्येक भागात स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (१४ ऑगस्ट) ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती भवनाने रविवारी (१३ ऑगस्ट) एका निवेदनात म्हटले आहे की, संध्याकाळी ७ वाजल्यापासून ऑल इंडिया रेडिओच्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर आणि दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये संबोधन प्रसारित केले जाईल.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवणार आहेत. ऐतिहासिक वास्तूच्या तटबंदीवरून ते देशाला संबोधित करणार आहेत. या स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती देताना संरक्षण मंत्रालयाने रविवारी (१३ ऑगस्ट) सांगितले की, स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात १८०० लोक सहभागी होतील.

या सोहळ्याला ‘विशेष’ म्हणून उपस्थित राहण्यासाठी सुमारे १८०० लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘विशेष पाहुण्यांमध्ये ४०० हून अधिक गावांतील सरपंचांचा समावेश आहे.

मंत्रालयाने सांगितले की, स्वातंत्र्य दिनानिमित्त सरकारने आपल्या विविध योजनांसाठी १२ वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारले आहेत. यामध्ये नॅशनल वॉर मेमोरियल, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, प्रगती मैदान, राजघाट, जामा मशीद मेट्रो स्टेशन, राजीव चौक मेट्रो स्टेशन, दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, ITO मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वाराचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड