डाळींचे भाव कडाडले; सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये वाढ

पुणे, २० जानेवारी २०२३ : आधीच महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. त्यात आता बजेटआधी डाळींचे दर महाग झाले आहेत. सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्यांच्या घरातील बजेटमध्ये वाढ होते. देशातील अनेक भागांत डाळींचे दर वाढले आहेत. हरभरा डाळींचे दर सध्या एमएसपीपेक्षा जास्त आहेत.

तज्ज्ञांच्या मते पिकांच्या उत्पादनापासून ते पिकांमधील रोगराई, मागणीच्या तुलनेत पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. उडीद, मूग आणि तूर डाळींबाबत तज्ज्ञ सर्वांत जास्त चिंता व्यक्त करीत आहेत. परदेशातून उडीद, मूग यांची आवक वाढल्याने उडीद आणि मुगाचे दर नियंत्रणात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सध्या हरभऱ्याचे दर एमएसपीच्या पलीकडे जात आहेत. १८ जानेवारीला कर्नाटकात कमाल भाव ११,९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचला, तर महाराष्ट्रात ११,५०० रुपये प्रतिक्विंटल, उत्तर प्रदेशात ९९९० रुपये आणि गुजरातमध्ये ७२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर पोचला आहे. पुरवठ्यात घट झाल्याने ही दरवाढ झाली आहे.

कर्नाटकात यावर्षी १ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत २५,६८० टन डाळींची आवक झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ३१,१९३ टन होती. महाराष्ट्रात याच कालावधीत आवक २०,९८३ टनांवरून १८,२९७ टनांवर आली आहे. गुजरातमध्ये हा आकडा ४७१७ टनांवरून ३८११ टनांवर आला आहे.

कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ सुनील बलदेव यांच्या मते, सध्या चिंता उडीद, मूग आणि हरभरा यांची आहे. त्यांच्या मते हवामानाचा परिणाम या पिकांच्या उत्पादनावर दिसत आहे. सरकारी साठ्यातील मुगाचे प्रमाण पुरेसे असल्याने त्याच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

देशातील उडिदाच्या उत्पादनावर परिणाम झाला असला, तरी शेजारच्या ब्रह्मदेशात त्याचे चांगले उत्पादन झाले असल्याने त्याच्या पुरवठ्याबाबत चिंता कमी आहे. सध्या आफ्रिकन देशांमधून डाळींचा पुरवठा सुरू असून, पुढील तीन आठवड्यांत आणखी ५० ते ६० हजार टन डाळींची आवक होणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा