मुंबई,२७ जून२०२०: राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी नेमलेल्या बदली समितीला नव्याने संगणकीय सॉफ्टवेअर बनविण्यास सूचना दिली असल्याची माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे .
राज्यातील कोरोना विषाणु संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळा सूरू करणेबाबत शिक्षक व पालक यांच्यात असलेले संभ्रम आणि शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत चर्चा करण्यासाठी ग्राम विकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरूटे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शिक्षक बॅकेचे चेअरमन नामदेव रेपे, संचालक राजमोहन पाटील, बाजीराव कांबळे ,जी.एस पाटील, तुकाराम राजगुडे एच.एन.पाटील, सखाराम राजगुडे, रावण आदींनी भेट घेऊन चर्चा केली.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत राज्यातील शाळा चालू करणार नाही तसेच येत्या काही दिवसात याबाबत स्पष्ट परिपत्रक काढण्यात येईल असे ग्राम विकास मंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे.
बदल्यांच्या संदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कोरोना आपत्कालीन काळात कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि बढती एक वर्ष करणार नाही असा निर्णय घेतला असला तरी शासनाला आर्थिक बोजा पडणार नाही या अटीवर शिक्षकांच्या बदल्यांबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणत: जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे आतंरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी नेमलेल्या बदली समितीला सॉफ्टवेअर तयार करण्याची सूचना दिली आहे. ग्राम विकास मंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील