तमिळनाडूमध्ये तेल आणि वायू क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण

तामिळनाडू, १८ फेब्रुवरी २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे तामिळनाडूमधील तेल आणि वायू क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि शिलान्यास केला. रामनाथपुरम-थोथुकुडी नैसर्गिक वायुवाहिनी आणि मनाली येथील चेन्नई पेट्रोलियम महामंडळात गॅसोलाइन डिसल्फरायझेशन (गंधकमुक्तीकरण) एकक हे प्रकल्प पंतप्रधानांनी राष्ट्राला अर्पण केले. नागपट्टीनम येथे कव्हर खोरे तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा शिलान्यासही त्यांनी केला. तामिळनाडूचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

वर्ष २०१९-२० मधील इंधन गरजेपैकी ८५%पेक्षा अधिक तेलाची आणि ५३% वायूची भारताला आयात करावी लागल्याचे पंतप्रधान नमूद केले. “आपल्यासारख्या वैविध्यसंपन्न आणि प्रज्ञावंत देशाला ऊर्जेसाठी आयातीवर इतके अवलंबून राहणे शक्य होईल का?” असा प्रश्न विचारत पंतप्रधानांनी, ‘आपण पूर्वीच या विषयांकडे लक्ष पुरविले असते तर आपल्या मध्यमवर्गावर असा भार पडला नसता’ असे नमूद केले. “आता ऊर्जेच्या स्वच्छ आणि हरित स्रोतांसाठी प्रयत्न करणे आणि ऊर्जेच्या बाबतीतले परावलंबन कमी करणे हे आपले सामूहिक उत्तरदायित्व आहे”, असे त्यांनी सांगितले. “मध्यमवर्गाच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींप्रती, मध्यमवर्गाच्या चिंतांप्रती आमचे सरकार संवेदनशील आहे” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

हे साध्य करण्यासाठी आता भारतात इथेनॉलवर भर दिला जात आहे. यातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा फायदा होईल. सौर ऊर्जेचा वापर अधिक वाढविण्यावर भर दिला जात असून या क्षेत्रात झेप घेण्यासाठी व जगाचे नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन दिले जात आहे. एलईडी दिव्यांसारख्या पर्यायी साधनांचा अंगीकार करून मध्यमवर्गीय घरांमध्ये ऊर्जेची व पैशाची मोठी बचत करण्यावर भर दिला जात असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.

वाढती ऊर्जा गरज भागविण्यासाठी प्रयत्न करतानाच, एकीकडे ऊर्जेच्या आयातीवरची अवलंबिता कमी करण्याचा आणि दुसरीकडे आयातीच्या स्रोतांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न सुरु असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. यासाठी क्षमता उभारणी केली जात आहे. वर्ष २०१९-२० मध्ये तेलशुद्धीकरण क्षमतेत भारताचा क्रमांक जगात चौथा होता. सुमारे ६५.२ दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करण्यात आली आहे. हे प्रमाण पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

जगातील २७ देशांमध्ये तेल आणि वायू कंपन्यांमध्ये भारत सहभागी असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी सुमारे दोन लाख सत्तर हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचाही उल्लेख केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा