श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणेशोत्सवाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

पुणे, 17 सप्टेंबर 2021: पुणेकरांचा लाडका बाप्पा दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे चक्क पंतप्रधानांकडून कौतुक करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ऑनलाईन माध्यमांच्या सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑगमेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाद्वारे गणेशभक्तांना घरबसल्या आरतीचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशाच पत्र ट्रस्टला पाठवले आहे.
गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती यंदाच्या गणेशोत्सवात जगभरातील 70 हजार 605 गणेशभक्तांनी स्वत:च्या घरातून केली. उत्सवाच्या सहाव्या दिवसापर्यंत सुमारे 60 देशांतील भाविकांनी आॅगमेंटेंड रिअ‍ॅलिटी या ट्रस्टने पुढाकार घेऊन दिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आरती केली. तर, 20 हजारहून अधिक भाविकांनी अनेकदा या तंत्राचा वापर केल्याचे दिसून आले आहे.
काय आहे पत्रात
“श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टद्वारे साजरा केला जात असलेल्या 129 व्या गणेशोत्सवाबद्दल जाणून आनंद वाटला. करोना महामारी पाहता भाविकांना व्हर्च्युअल माध्यमाने श्री गणेश दर्शन आणि आरतीचे आयोजन प्रशंसनीय आहे. लोकामान्य बाळ गंगाधर टिळकांनी आस्थेला समाज आणि संस्कृतीसोबत जोडून, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी लोकांमध्ये एकजुटीची भावना बळकट केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टद्वारे आयोजित गणेशोत्सव त्याच समृद्ध परंपरेला बळकटी देतो आहे. अशा प्रकारच्या आयोजनासाठी ट्रस्टला हार्दिक शुभेच्छा.” असं पंतप्रधान मोदींनी पत्रात म्हटलेलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा