स्पेशल ‘चोला डोरा’ ड्रेस घालून पंतप्रधान मोदी पोहोचले केदारनाथाच्या दर्शनाला…

डेहराडून, २१ ऑक्टोबर २०२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून केदारनाथ आणि बद्रीनाथच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज सर्वप्रथम मोदी यांनी बाबा केदारनाथ यांचे दर्शन व पूजा केली. यानंतर त्यांनी केदारनाथ रोपवेची पायाभरणी केली. आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण केला. पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर दोन्ही धामांचे पुजारी आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. दर्शनानंतर मोदींनी मंदिर परिसरातील लोकांना अभिवादन केले.

चंबातील महिलांना दिलेले वचन मोदींनी केले पूर्ण!

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी नुकताच हिमाचल प्रदेशचा दौरा केला होता. यावेळी हिमाचल प्रदेशातील चंबा येथील महिलांनी स्वत: हातांनी बनवलेला पोशाख मोदी यांना भेट देण्यात आला होता. भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी महिलांना वचन दिले होते की, कोणत्याही थंड ठिकाणी प्रवास करताना या पोशाखाचा वापर केला जाईल, असे आश्वासन दिले होते. आज हा पोशाख परिधान करून त्यांनी आपले वचन पूर्ण केले आहे. या पोशाखाला ‘चोला डोरा’ असे म्हणतात. त्यावर अतिशय सुरेख हस्तकला आहे.

खास आहे ‘हा’ दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीपूर्वी उत्तराखंडमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा हा दौरा विशेष मानला जात आहे. पंतप्रधान या दौऱ्यात ३४०० कोटीहून अधिक रूपयांच्या विकास योजनांची पायाभरणी करतील. या अंतर्गत पीएम मोदी केदारनाथ रोप-वे प्रकल्पाची पायाभरणी करतील. हा रोप-वे ९.७ किमी लांब असून, तो गौरीकुंडाला केदारनाथशी जोडेल. सध्या हे अंतर कापण्यासाठी जवळपास ६ तास लागतात. रोप-वे बनल्यानंतर हा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत होईल.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आज भारतातील शेवटचे गाव माना येथेही जाणार आहेत. तिथे ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. हे गाव चीनच्या सीमेवर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा