मुंबई, २३ नोव्हेंबर २०२०: देशातील करोना रूग्णांची एकूण संख्या ९१ लाखांवर गेली आहे. आतापर्यंत ९१ लाख २९ हजार ३ नागरिकांना करोना संसर्ग झाला आहे. यापैकी ८५ लाख ५० हजार ९३१ नागरिक करोनातून बरे झाले आहेत, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, दिवाळीनंतर देशभरात या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झालीय तर दिल्लीमध्ये कोरोनाची दुसरी लाट देखील आलीय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत. २४ नोव्हेंबरला सकाळी १० किंवा ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. ही बैठक २ टप्प्यांमध्ये पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडं महाराष्ट्रात देखील वेगळी परिस्थिती नाही. ज्या राज्यातील कोरोना केसेसची संख्या जास्त आहे, त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान सर्वात आधी बैठक घेणार आहेत. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ८ राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकामागून एक दोन बैठका घेतील. करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ते आधी चर्चा करतील. दुसर्या बैठकीत मुख्यमंत्री किंवा अन्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी चर्चा होईल. या बैठकांमध्ये पंतप्रधान मोदी हे लस वितरण प्रक्रिया आणि करोनाची दुसरी लाट रोखण्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे