नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर २०२२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष महामहिम व्होलोदेमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर उभय नेत्यांनी यावेळी चर्चा केली.
युद्ध लवकर संपवण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला तसेच संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याची गरज व्यक्त केली. संघर्षावर लष्करी तोडगा असू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि शांततेसाठीच्या कोणत्याही प्रयत्नांमध्ये योगदान देण्याची भारताची तयारी असल्याचे सांगितले.संयुक्त राष्ट्रांचे अधिकार,आंतरराष्ट्रीय कायदा आणि सर्व देशांच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याच्या महत्त्वाचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
युक्रेनसह पाश्चात्त्य देशांनी व अमेरिकेने या युक्रेनच्या डोनेस्क, लुहान्स्क, खेरसन आणि झोपोरीझिया चार प्रांतांत रशियाने घेतलेले सार्वमत अवैध ठरवून नाकारले आहे. हे सार्वमत जबरदस्तीने घेतल्याने बेकायदेशीर आहे, असे युक्रेनचे म्हणणे आहे. दरम्यान, युक्रेनच्या लष्कराने रशियाव्याप्त पूर्व युक्रेनमधील लायमनच्या मुख्य भागावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. रशियाने याला दुजोरा देत सांगितले, की युक्रेनच्या लष्कराचा वेढा पडू नये म्हणून आमच्या सैन्याने लायमनमधून माघार घेतली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड