नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिहारमधील एनडीएच्या खासदारांची संसद अनेक्सी बिल्डिंगमध्ये बैठक घेतली. एनडीएच्या खासदारांसोबत पंतप्रधान मोदींची ही तिसरी बैठक आहे. या बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते.
या आधी बुधवारी पंतप्रधान मोदींनी तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार बेट आणि लक्षद्वीपमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. खासदारांनी त्यांच्या क्षेत्रातील कामाची प्रसिद्धी करावी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
३१ जुलै रोजी, पंतप्रधान मोदींनी पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशामधील भाजप आणि एनडीएच्या खासदारांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी त्यांनी सर्व खासदारांना जनतेमध्ये जाऊन सरकारची कामे सांगण्यास सांगितले होते. यादरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या ‘इंडिया’च्या युतीबद्दल म्हटले होते की, विरोधकांनी केवळ कपडे बदलले आहेत, चारित्र्य नाही. कपडे बदलून चारित्र्य बदलत नाही. यूपीएच्या चारित्र्यावर अनेक डाग आहेत, त्यामुळेच त्यांना नाव बदलावे लागले.
पीएम मोदी ३१ जुलैपासून भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांना भेटत आहेत. १० ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या बैठकांमध्ये २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यासाठी भाजप नेत्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी एनडीएच्या खासदारांचे १० गट तयार केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड