पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर; मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी या ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांना दाखविणार हिरवा झेंडा

मुंबई, १० फेब्रुवारी २०२३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन ‘वंदे भारत’ ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आणि दाऊदी बोहरा समाजाच्या शैक्षणिक संस्थेच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करतील. रेल्वे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले, की शहरात पोचल्यानंतर मोदी प्रथम दुपारी सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील साईनगर शिर्डी ते मुंबईला जोडणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेस ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

त्यामुळे मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची संख्या तीन झाली असून, त्यांची देशभरात एकूण संख्या १० होईल. सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालविल्याने दोन्ही शहरांमधील संपर्क सुधारेल आणि सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे जाणाऱ्या यात्रेकरूंची सोय होईल.

दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी आणि शनी शिंगणापूर येथे जाणाऱ्या भाविकांची दुसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सोय होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आदी या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्याच्या वेळी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान पंतप्रधान मुंबईतील मरोळ येथे अल्जामिया-तुस-सैफियाच्या (सैफी अकादमी) नवीन कॅम्पसचे उद्घाटनही करतील. अल्जामिया-तुस-सैफिया ही दाऊदी बोहरा समाजाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था समाजातील साहित्य संस्कृतीचे रक्षण करण्याचे काम करीत आहे.

मुंबईतील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी पंतप्रधान सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास राष्ट्राला समर्पित करतील. दरम्यान, शुक्रवारी दक्षिण मुंबई, मरोळ आणि अंधेरी परिसरातील वाहतुकीवर परिणाम होणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा