सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली, २४ सप्टेंबर २०२०: राज्यांना आपत्ती निवारण साहाय्यता निधी वापरण्यासाठी असलेली ३५ टक्क्यांची मर्यादा आता ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. कोविड १९ ची रुग्णसंख्या जास्त असलेल्या सहा राज्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांची त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज बैठक घेतली, त्या वेळी ते बोलत होते.

कोविड १९ साथीचा सामना करण्यासाठी या राज्यांना निधीही वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या राज्यांमधील कोविड १९ ची स्थितीचा आणि उपचार यंत्रणेच्या तयारीचा मोदी यांनी आढावा घेतला. देशातील एकूण रुग्ण संख्येच्या ६३ टक्के रुग्णसंख्या या राज्यांमध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब आणि दिल्ली यांचा समावेश आहे.

कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी मास्क अत्यंत महत्त्वाचा आहे, असंही त्यांनी सांगितलं. चाचण्या, मागोवा आणि उपचार यावर भर देण्यासह सर्वेक्षण आणि मागोवा घेण्यासाठीची यंत्रणा सुसज्ज करण्यावर त्यांनी भर दिला.

राज्यांनी संयम, संवेदना आणि सहकार्य कायम ठेवणं आवश्यक असून कोविड १९ च्या साथीचा सामना करण्यासाठी आवश्यक सुविधा मजबूत करणं महत्त्वाचं आहे. या कठीण काळात भारतानं जगाची जीवरक्षक औषधांची गरज भागवली आहे, असंही त्यांनी सांगितलं. सद्यस्थितीत एक राज्यातून दुसऱ्या राज्यात औषधांचा पुरवठा सुरळीत होईल, यावर लक्ष देणं आवश्यक आहे.

राज्यांमधील मालवाहतूक बंद ठेवल्यानं सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे, त्यामुळं नियमित देखरेखीखाली पुरवठा साखळी कार्यरत ठेवणं उपयुक्त ठरेल, असं मोदी यांनी सांगितलं. कोविड १९ च्या साथीशी लढताना आता आर्थिक आघाडीवरही लक्ष देणं आवश्यक आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा