अगरतला, ११ फेब्रुवारी २०२३ :त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत सत्ताधारी पक्ष भाजपने आपला निवडणूक प्रचार तीव्र केला आहे. त्रिपुरामध्ये भाजपचे अनेक तगडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. त्याचवेळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शनिवारी सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.
मोदी म्हणाले, त्रिपुरा निवडणुकीची ही माझी पहिलीच जाहीर सभा आहे आणि इथे मी बघतोय की एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमले आहेत की, जिथे माझी नजर पोहोचते तिथे फक्त लोकच दिसत आहेत. तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आला आहात. जोश आणि उत्साहाने भरलेले हे मैदान निवडणुकीचे निकाल काय लागणार हे सांगत आहे. तुमचे येथे विक्रमी संख्येने येणे म्हणजे भाजप सरकारच्या पुनरागमनाची घोषणा आहे. तुमचा आकडा पाहून आमच्या विरोधकांची झोप उडेल. आज संपूर्ण त्रिपुरा म्हणत आहे – एकच नारा, एकच नारा… पुन्हा एकदा – भाजप सरकार. मी तुमची मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
- त्रिपुरा भीती, दहशत आणि हिंसाचारातून मुक्त
विरोधकांवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की,
काँग्रेस आणि डाव्यांनी त्रिपुराला विकासाच्या बाबतीत मागासले होते, मात्र आमच्या सरकारने अवघ्या पाच वर्षात त्रिपुराला वेगवान विकासाच्या मार्गावर आणले आहे. हिंसा आणि मागासलेपण ही आता त्रिपुराची ओळख राहिलेली नाही. त्रिपुरामध्ये यापूर्वी एकाच पक्षाला झेंडा फडकावण्याची परवानगी होती. मात्र, आज भाजप सरकारने त्रिपुराला भीती, दहशत आणि हिंसाचारातून मुक्त केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
एक काळ असा होता की त्रिपुरामध्ये फक्त डाव्या कॅडरला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळत असे. मात्र राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला आता सरकारी योजनेत लाभ मिळतो आहे.पोलीस ठाण्यांवरही सीपीएम कॅडरचा कब्जा होता. भाजपाचे सरकार आल्यानंतर राज्यात कायद्याचे राज्य आले आहे असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.