पंतप्रधान नरेंद्र मोदींची चीनवर नाव न घेता टीका

राजस्थान, १४ नोव्हेंबर २०२०: दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही दिवाळी साजरी करण्यासाठी राजस्थानच्या जैसलमेर येथील लोंगेवाल चौकीवर पोहोचले आहेत. तुमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यावर माझा आनंद द्विगुणीत होतो, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच “आज संपूर्ण जग विस्तारवादी ताकदींमुळं कंटाळलं आहे. ही विस्तारवादी वृत्ती एक प्रकारे मानसिक विकृती असून ती १८व्या शतकातील विचार दर्शवते. भारत या विचारांच्याविरोधात प्रखर आवाज बनला आहे,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या भूमिकेवर नाव न घेता सडकून टीका केली.

मी आज तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. प्रत्येक भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे. त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद घेऊन आलो आहे, असं सांगतानाच वीर माता-भगिनींनाही मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या त्यागाला नमन करतो. ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात आहेत, त्यांनाही मी वंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तुम्ही हिमाच्छादीत डोंगराळ भागात किंवा वाळवंटात कुठेही असले तरी तुमच्यामध्ये आल्यावरच माझी दिवाळी पूर्ण होते. तुमच्या चेहऱ्यावरील समाधानाची भावना पाहिल्यावर माझा आनंद द्विगुणीत होतो, असंही ते म्हणाले.

मोदी म्हणाले, “आज जगाला हे कळतंय की भारत आपल्या हितांविरोधात कोणत्याही किंमतीत थोडीही तडजोड करणार नाही. भारताची शान आणि उंची आपल्या शक्ती आणि पराक्रमामुळं टिकून आहे. आपण देशाला सुरक्षित ठेवलं आहे त्यामुळे आज भारत जागतीक व्यासपीठांवर प्रखरतेने आपली बाजू मांडत आहे.”

“आंतरराष्ट्रीय सहकार्य कितीही पुढे आलेलं असलं आणि समीकरणं कितीही बदलली असली तरी आपल्याला हे विसरता येणार नाही की, सतर्कता हाच आपल्या सुरक्षेचा मार्ग आहे. सजगता हीच सुख-चैनीचा पाठिंबा आहे. सामर्थ्यचं विजयाचा विश्वास आहे. सक्षमताच शांतीचा पुरस्कार आहे,” अशा शब्दांत मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा