नवी दिल्ली, २६ जानेवारी २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या खास प्रसंगी खास फेट्यामध्ये दिसून येतात. आज ७४ व्या प्रजासत्ताक दिनीदेखील पंतप्रधान मोदी यांनी खास पेहराव केला होता. आजच्या प्रजासत्ताक दिनी मोदींच्या फेट्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्यात आज वसंत पंचमी आहे. याच खास दिनाचे औचित्य साधत मोदींनी खास बहुरंगी राजस्थानी फेटा, क्रिम कलरचा कुर्ता, ब्लॅक जॅकेट, पांढऱ्या रंगाचा स्टोल आणि काळे शूज असा पेहराव केला.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी पीएम मोदी युद्ध स्मारकावर पोहोचले तेव्हा पंतप्रधान मोदींच्या या वर्षीच्या ड्रेसची पहिली झलक समोर आली. आज परिधान केलेल्या फेट्यामध्ये पिवळा आणि भगवा रंग प्रकर्षाने दिसून आला.
गेल्या वर्षी, पंतप्रधान मोदींच्या पोशाखाला उत्तराखंड आणि मणिपूरचा वेगळा स्पर्श होता कारण त्यांनी उत्तराखंडची ब्रह्मकमळ टोपी घातली होती आणि मणिपूरचे लीरम फी स्टोल त्यांनी परिधान केले होते.
तर २०२० मध्ये पीएम मोदींनी भगवी बंधेज टोपी घातली होती. ही टोपी जामनगरच्या शाही राजघराण्याने नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिली होती.
- प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांचा संदेश :
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा. यावेळीही हा प्रसंग खास आहे, कारण आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान तो साजरा करत आहोत. महान स्वातंत्र्याची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही एकजुटीने पुढे जाऊ इच्छितो. देशाचे लढवय्ये सत्यात उतरतात. सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!, असे म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.