वसतीगृहात तात्पुरते उभारलेल्या कारागृहातून कैदी फरार.

उस्मानाबाद, २८ जुलै २०२० : कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सर्वत्र कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांच्या आकड्यात वाढ होत असल्याने, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन बरेचसे पर्याय काढत आहेत. कारागृहामध्ये देखील कोरोनाने शिरकाव केला असल्याने, उस्मानाबाद शहरातील राजमाता जिजाऊ मुलींचे वसतीगृह या ठिकाणी तात्पुरते कारागृह उभारण्यात आलेले आहे. कोरोना बाधीत तसेच कोरोना संशयीत असणाऱ्या कैद्यांना या तात्पुरत्या असणाऱ्या कारागृहात ठेवले असून त्यांचे त्या ठिकाणी उपचार चालू आहेत.

या संबंधित कारागृहात खोली क्रमांक ४ मध्ये ठेवलेला कैदी दिनांक २७ जुलै रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास खिडकीला असणारी जाळी, गज उचकटून फरार झाल्याचे समोर आले आहे. संबंधित फरार आरोपी गजा पंडित शिंदे वय वर्ष २५,हा न्यायालयीन बंदी क्रमांक १४६/२०२० परंडा तालुक्यातील अनाळा येथील रहिवासी आहे. घडलेल्या या प्रकरणावरून, कारागृह कॉन्स्टेबल संदीप गांगुर्डे यांनी सरकार तर्फे दिलेल्या पहिल्या खबरेवरुन संबंधित कैद्याविरोधात भा. दं.सं.कलम २२४ अन्वये आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविलेला आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा