औरंगाबाद-नगर महामार्गावर खासगी बसला भीषण आग; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल, जीवितहानी नाही

5

पुणे, २१ जानेवारी २०२३ : औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर औरंगाबादकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसला आग लागली. शहरातील बाबा पेट्रोलपंप येथे प्रवासी उतरल्यानंतर डिझेल भरायला भरायला जात असताना ही आग लागली आणि यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र बस जळून खाक झाली. ही घटना नगर नाक्यावरील केंद्रीय विद्यालयासमोर शनिवारी (ता. २१) सकाळी ७.३०च्या सुमारास घडली.

हिमालया ट्रॅव्हल कंपनीची ही बस नागपूरहून औरंगाबादला आली होती. बसचा शेवटचा थांबा हा बाबा पेट्रोलपंप होता. या ठिकाणी सर्व प्रवासी बसमधून उतरले होते. बसचालक डिझेल भरण्यासाठी बस बाबा पेट्रोलपंपाच्या दिशेने घेऊन गेला; मात्र अचानक बसला आग लागल्याचे त्याच्या निदर्शनास येताच चालकाने प्रसंगावधान राखत बसमधून खाली उतरत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्यांनीही आग विझविण्यास सुरवात केली; मात्र बसला लागलेल्या एवढी भीषण होती, की धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरले होते. अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी मोहन मुंगसे, डी. डी. साळुंके, एल. पी. कोल्हे आदींसह सहकार्‍यांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला; मात्र खासगी ट्रॅव्हल्स बसच्या अपघातांमध्ये झालेल्या वाढीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील