प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

पुणे : खेड शिवापूर येथे पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या संजय भोसले यांच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात राजगड पोलिसांना यश आले आहे. मृत भोसले यांच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे.

याबाबत राजगड पोलिसांनी शीतल संजय भोसले (वय २९, रा. एकसळ, ता. कोरेगाव, जि. सातारा), योगेश कमलाकर कदम (वय २९, रा. रहाटणी, पिंपरी चिंचवड), मनीष नारायण मदने (वय ३२, रा. काळेवाडी, पिंपरी चिंचवड), राहुल अशोक काळे (वय ३५, रा. नखातेनगर, थेरगाव, पिंपरी चिंचवड) या चौघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय भोसले हे भारतीय सैनिकात कामाला होते. परंतु सध्या ते काळेवाडी-रहाटणे येथे राहायला होते. संजय हे त्यांची पत्नी शीतल हिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे होते.
त्यातच शीतल हिचे योगेश कदम याच्याशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते. यावरून तसंजय आणि शीतल यांच्यात अनेकदा वाद होत होते. संजय हे येत्या ऑक्‍टोबर महिन्यात सुटीवर आले होते. त्यामुळे शीतल आणि योगेश यांना त्यांचा अडथळा निर्माण होत होता. त्या दिवशी त्यांच्यामधील वाद वाढला. त्यामुळे शीतल हिने योगेश याच्या मदतीने संजय याचा काटा काढायचे ठरवले.
त्यानुसार ७ नोव्हेंबरच्या रात्री योगेश याने शीतल हिला सोडिअम साइनाईडची गोळी पाण्यातून दिली. त्यातच संजय यांचा मृत्यू झाला. त्यानंतर योगेश याने मनीष मदने व राहुल काळे या दोघांच्या मदतीने संजय यांचा मृतदेह पुणे- सातारा रस्त्यावर खेड शिवापूर परिसरात टाकून दिला.

राजगड पोलिसांनी तपासाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पत्नी शीतल हिची चौकशी केली. मात्र, तिच्या बोलण्यात विसंगीत आढळल्याने तिचे सर्व कॉल रेकॉर्ड तपासले. त्यावरून पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. त्यात तिने गुन्ह्याची कबुली दिली.

राजगडचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार सुधीर होळकर, दिनेश कोळेकर, महादेव कुतवळ, गणेश लडकत, नरेश येमूल यांच्या पथकाने ही कामगिरी केली. सदर प्रकार वाकड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, आरोपींना वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा