नवी दिल्ली, १९ ऑगस्ट २०२३ : सर्वच राजकीय पक्षांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीपासून ते एनडीएपर्यंत तसेच स्वतंत्र पणे लढणाऱ्या राजकीय पक्षांनीही लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकायच्या त्याचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. मात्र, काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वाराणासीतून प्रियांका गांधी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. गांधी घराण्यातील नवीन चेहऱ्याला मतदारांची सहानुभूती मिळू शकते. त्यामुळे मोदी यांच्यासाठी २०२४ ची लोकसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय राय यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे पुन्हा एकदा अमेठीतून लढणार असल्याचे अजय राय यांनी सांगितले. त्यामुळे राहुल गांधी यांची लढत अमेठीच्या विद्यमान खासदार स्मृती ईराणी यांच्याशी होणार आहे. तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या वाराणासीतून निवडणूक लढवणार आहेत.
प्रियांका गांधी यांची थेट लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात होणार आहे. प्रियंका गांधी यांची ही पहिलीच सार्वजनिक निवडणूक असणार आहे. तर मोदी हे वाराणासीतून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे वाराणासीतून प्रचंड मोठी लढत होईल. मोदींसाठी ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नसेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
यावेळी अजय राय म्हणाले, प्रियंका गांधी वाराणासीतून लढतील. त्यांच्यासाठी एक एक कार्यकर्ता जिवाची बाजी लावून प्रचार करेल. आम्ही त्यांचे संपूर्ण समर्थन करणार आहोत, असे अजय राय यांनी म्हटले आहे. अजय राय यांनी दोन वेळा २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींविरोधात वाराणासी मतदार संघातून निवडणूक लढवली आहे.
काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना मोदींविरोधात वाराणासीतून उतरवण्यामागे इंडिया आघाडीची मोठी खेळी असल्याचं सांगितले जात आहे. प्रियंका गांधींना वाराणासीतून उतरवल्यास ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरेल. मोदींसमोर जिंकण्याचे मोठे आव्हान असेल. त्यामुळे मोदींना मतदारसंघात अधिकाधिक वेळ द्यावा लागेल. त्यांना इतर राज्यातील दौरे आणि सभांना कमी वेळ मिळेल. मोदींना खिंडीत गाठण्यासाठी आणि वाराणासीतून गुंतवून ठेवण्यासाठीच , प्रियांका गांधी यांना वाराणासीतून निवडणुकीत उतरवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर