प्रियांका रेड्डीच्या हत्येचा संतापजनक अहवाल

हैद्राबाद: तेलंगणातील हैदराबाद येथे घडलेल्या प्रियंका रेड्डी सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचे आणखी काही धागेदोरे रविवारी पोलिसांकडून उघड करण्यात आले आहेत. बलात्कार आणि हत्या झालेल्या रात्री नक्की काय घडले. याबाबत पोलिसांचा अहवाल उघड झाला आहे.
पोलिसांच्या तपासामध्ये हा मृतदेह प्रियंका रेड्डी या पशूवैद्यकीय डॉक्टरचा असल्याचे समोर आले. सामूहिक बलात्कार करून पुरावा नष्ट करण्यासाठी नराधमांनी तिला जाळून मारल्याचे समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. आरोपींना तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी अशी मागणी देशभरातून सुरू झाली.

तेलंगणा पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणी मोहम्मद आरिफ, शिवा (पूर्ण नाव माहीत नाही) , नवीन (पूर्ण नाव नाही) आणि चिंताकुंता चेन्नकेशवूलू या चार आरोपींना अटक केली. न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तसेच या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्यात दिरंगाई करणाऱ्या तीन पोलिसांना देखील शनिवारी निलंबीत करण्यात आले आहे. रविवारी सायराबाद पोलिसांनी रिमांड रिपोर्ट सादर केला. या रिपोर्टमध्ये पोलिसांनी त्या रात्री (२७-२७ नोव्हेंबर) नक्की काय घडले याबाबत माहिती दिली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी आरिफने १० वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. २०१२ ते २०१५ या दरम्यान तो कुकाटपल्ली भागात रिक्षा ड्रायव्हरचे काम करत होता. यानंतर २०१७ पासून त्याने लॉरी (ट्रक) ड्रायव्हरचे काम सुरू केले.

‘त्या’रात्री नक्की काय घडले?

बुधवार (दि.२७)सायंकाळी ५.३०मिनिटांनी मुख्य आरोपी आणि लॉरी ड्रायव्हर आरिफ याने दारूच्या काही बाटल्या खरेदी केल्या. चौघे आरोपी शमशबाद टोल प्लाझाजवळ लॉरीच्या केबिनमध्ये दारू पित बसले. त्यानंतर अर्ध्यातांसाने म्हणजे सायंकाळी ६ वाजता एक तरुणी आपल्या लॉरीसमोर स्कुटी लावून क्लिनिककडे गेल्याचे आरोपींनी पाहिले. आरोपी नवीन याने तरुणीच्या स्कुटीचे टायर पंक्चर केले. नंतर चौघांनी तिचा गैरफायदा घेण्याचे ठरवले. त्यानंतर रात्री ९.०० वाजता आरिफ आणि तिन्ही आरोपींनी आपली लॉरी घटनास्थळापासून ५ किलोमीटर दूर थोंडापल्ली जंक्शनजवळ पार्क केली.
त्यानंतर ते रात्री ९.१८मिनिटांनी प्रियांका क्लिनिकमधील काम संपवून आल्यानंतर प्रियंका हिला आपल्या स्कुटीचे एक टायर पंक्चर झाल्याचे दिसले. नंतर ९.३०मिनिटांनी एक
तरुणी मदत शोधत असताना आरोपी शिवा याने तिला मदतीचे आमिष दाखवले. याच दरम्यान तरुणीने आपल्या बहिणीला फोन करून स्कुटी पंक्चर झाल्याचे आणि भिती वाटत असल्याचे सांगितले. या परिस्थितीचा फायदा घेऊन आरोपींनी तिला उचलले आणि ट्रकच्या मागच्या बाजूला असणाऱ्या कंपाऊंडमध्ये नेले. यात मुख्य आरोपी नवीन याने तिचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि तिला जबरदस्ती दारू पाजण्याचा प्रयत्न केला. यानंतर चारही आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपींनी तिची हत्या करण्याचे ठरवले. मुख्य आरोपी आरिफने पीडितेचे तोंड आणि नाक दाबून हत्या केली. मुख्य आरोपी नवीन याने तिचा फोन, घड्याळ आणि पॉवर बँक काढून घेतली. यानंतर चारही आरोपींनी पीडितेचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि शिवा व नवीने पीडितेची स्कुटी घटनास्थळापासून लांब नेऊन ठेवली. या दरम्यान शिवाने एका बाटलीमध्ये पेट्रोल खरेदी केले.आरोपींनी नॅशनल हायवे ४४ जवळील सब वेमध्ये पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
परंतु गुरुवार दि २८ नोव्हेंबर २०१९ रोजी चारही आरोपी आरामगढला पोहोचले. शिवा, नवीन, चिंताकुंता चेन्नकेशवूलू आपापल्या घराकडे गेले. त्यानंतर सकाळी ७च्या दरम्यान प्रियंकाचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडला.