दहाव्या अखिल भारतीय गझल साहित्य संमेलनाचे सूर अकोला येथे ; सात व आठ जानेवारीला गुंजणार

पुणे, २० डिसेंबर २०२२ : मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलेचे सूर यावर्षी अकोल्यात गुंजणार आहेत. यंदाचे १० वे अखिल भारतीय गझल साहित्य संमेलन ता. सात व आठ जानेवारी २०२३ रोजी अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी, ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची निवड करण्यात आली आहे.

उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर; तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार, लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवार उपस्थित राहणार आहेत. गझल सागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गझलनवाझ पंडित भीमराव पांचाळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिस लॉन्स येथे हे दोनदिवसीय संमेलन पार पडणार आहे. गझल सागर प्रतिष्ठान मुंबई आणि तक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी, अकोला यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या संमेलनाचे उद्घाटन ता. सात जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध कवी आणि सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या अखिल भारतीय गझल संमेलनासाठी राज्य; तसेच इतर राज्यांमधून प्रथितयश; तसेच नवोदित गझलकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. या संमेलनात परिसंवाद, मुशायरा, गझल गायन मैफिली, गझलवर मुक्तचर्चा, गझल संगम : बहुभाषी गझल मुशायरा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा