चोपडा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोबदल्यासाठी कार्यकारी संचलकांच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन

चोपडा, जळगाव २३ नोव्हेंबर २०२३ : जळगाव जिल्ह्यातील चोपड़ा तालुक्यातील दहा गावांतील ४८३ शेतकऱ्यांची बागायती शेतजमिनी शासनाने विविध प्रकल्पांसाठी संपादित केली. परंतु, त्यांना १६ वर्षांपासून लढा देऊनही मोबदल्याचे जवळपास २३ कोटी अद्यापही मिळालेले नाहीत. या झोपलेल्या प्रशासनाला जाग यावी, यासाठी बुधवार २२ नोव्हेंबरपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयातच झोपा काढो आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत शेतजमिनी मोबदल्यासाठीची रक्कम हाती मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातच झोपा काढोचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

चोपडा तालुक्यातील गूळ मध्यम प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनींच्या मोबदल्यासाठी बुधवारपासून दुपारी साडेबारापासून शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील, विनोद धनगर यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शहरातील आकाशवाणी चौकातील तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन सुरू केले. याप्रसंगी गूळ प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी आंदोलनास सामोरे जात, शेतकरी नेते संदीप पाटील, विनोद धनगर व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली. कार्यकारी अभियंता पाटील यांनी सांगितले की, तीन कोटी ४० लाखांचा निधी मंजूर असून तो सर्वांना दिला जात असल्याचे सांगितले. मात्र, आता जोपर्यंत शेतजमिनीच्या मोबदल्याची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयात आंदोलनाची भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे.

शेतकरी नेते संदीप पाटील म्हणाले की, चोपडा तालुक्यातील २००८ मध्ये गूळ मध्यम प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यासाठी तालुक्यातील सुमारे ८३ हेक्टर बागायती शेतजमिनी तापी पाटबंधारे महामंडळाकडून संपादित करण्यात आल्या. १६ वर्षांपासून शेतजमिनींची खरेदी होऊनही मोबदल्यापोटीची सुमारे २० कोटी ९६ लाखांची रक्कम अजूनही मिळालेली नाही. गेल्या १६ वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी तापी पाटबंधारे महामंडळ कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. वेळोवेळी निवेदने दिली. अजूनही एक दमडीही मिळाली नाही. आम्ही व्याजाने पैसे काढून उतारे नील केले आहेत. आमचे सावकारी पैशांचे व्याज वाढत आहे, असे सांगत प्रकल्पग्रस्त शेतकरी राजू धनगर यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला.आता पूर्ण रक्कम हाती मिळत नाही, तोपर्यंत आमचे या कार्यालयात झोपा काढो आंदोलन सुरूच राहील असेही ते म्हणाले.

यावेळी शेतकरी विनोद धनगर म्हणाले की, शेतकरी भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी १६ वर्षांपासून लढाई लढत आहेत. यादरम्यान काही शेतकरी मृतही झाले आहेत. सध्या शेतकऱ्यांची दैना झाली आहे. दिवाळीत आम्ही मुरमुरे खाल्ले. मात्र, अधिकाऱ्यांची दिवाळी जोमात झाली. सद्यःस्थितीत पिकांना पाण्याची गरज असतानाही एक किलोमीटरवर असलेल्या गूळ मध्यम प्रकल्पातून कालव्यांना पाणी सोडले जात नाही. अगोदरच दुष्काळी छाया असताना प्रशासकीय स्तरावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली जात आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : आत्माराम पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा