रिफायनरीसारखे प्रकल्प कोकणात येऊ नयेत : राज ठाकरे

19

रत्नागिरी, ०५ डिसेंबर २०२२ रिफायनरीसारखे प्रकल्प कोकणासारख्या उत्तम जागी येऊ नयेत, अशी माझी इच्छा आहे; परंतु महाराष्ट्राचा विचार करता प्रकल्प दूर जाणे हे आता परवडणारे नाही. आधीच दोन प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे प्रकल्प येण्यापुर्वीच कोकणवासीयांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

राज ठाकरे सध्या कोकण दौर्‍यावर असून आज त्यांनी रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, लपून छपून भुरटे जमीन खरेदी करायला येतात त्यावेळीच खबरदारी घेतली तर संभाव्य नुकसान टळते. बाहेरची माणसे पट्टेच्या पट्टे खरेदी करतात तेव्हा लोकांना काहीच संशय येत नाही. हजारो एकर जमीन हातातून निघून जाते आपल्याला कळत नाही की या जमीनी कशासाठी खरेदी होते. यावर संशयही लोक घेत नाही. त्यामुळे यापुढे जमिनी विकताना दहावेळा विचार करा, असा सल्ला देखील राज ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांना दिला.

  • कोकणात सकारात्मक वातावरण

कोकणात मनसेसाठी सकारात्मक वातावरण आहे. कोकणातील पक्ष संघटना आगामी काळात मजबूत होईल. पक्षवाढीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यात केले जाणार असून, जानेवारी महिन्यात कुडाळला एक आणि रत्नागिरी किंवा चिपळूण दुसरी सभा घेतली जाणार आहे.

  • फक्त वाद घालायचे आहेत

यावेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत सुरु असलेल्या विधानावरही भाष्य केले. ते म्हणाले, अपयश झाकण्यासाठी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन वेगवेगळे विषय काढले जात आहेत. महारांजानी जे सांगितले, घडवले ते घ्यायचे नाही, फक्त वाद घालायचे आहेत. कोणत्या तरी विषयावरील लक्ष वळवण्यासाठी हे केले जात आहे. राज्यपालांकडूनही वक्तव्य झाली आहेत. त्यांच्याकडे पत आहे, पण पोच नाही, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

तर मध्यवर्ती निवडणुकीविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, गेल्या दोन ते अडीच वर्षात महापालिकेच्या निवडणूका झालेल्या नाहीत, त्याचे उत्तर मिळत नाहीत तोपर्यंत मध्यावधी निवडणुकांचा विषय होणार नाही.

  • टोल घेऊ देणार नाही

मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदीकरणाचे काम अजुनही सुरु झालेले नाही. तरीही टोल घेण्याबाबत पावले उचलली जात आहेत. यावर राज ठाकरे म्हणाले, टोल बंद करण्यासंदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांना सुचना दिलेल्या आहेत. मी सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौर्‍यावर आलोय म्हणून टोल घेण्यास आरंभ झालेला नाही. मनसे तिसरा पर्याय आहे. लवकरच कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भुमिका घेताना दिसतील. मी त्यासाठीची रत्नागिरी दौर्‍यावर आलो आहे. पुढील काही दिवसात रत्नागिरीतील संघटनेत जमिन- आस्मानाचा फरक दिसेल, असा विश्वास ही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी :जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा