हाथरस (उत्तर प्रदेश), १ ऑक्टोबर २०२०: उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील मुलीवर निष्ठूरपणे अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी त्याची दखल वेळीच घेतली नाही. तिच्या मृत्युनंतर तिचा मृतदेह हा कुटुंबाच्या ताब्यात न देता रात्री ३ वाजता परस्पर जाळला. ही घटना अतिशय निंदनीय आहे.
बारामती येथे मेहतर वाल्मीकी समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले. उत्तर प्रदेशातील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची जीभ कापत, मानेची हाडे मोडण्यात आली. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तो खटला उत्तर प्रदेशच्या बाहेर विशेष न्यायालयामध्ये चालवण्यात यावा. यामध्ये संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविन्यास उशीर केला. त्या मुलीचा मृतदेह कुटुंबच्या परस्पर रात्री ३ वाजता जाळला. याची चौकशी होऊन त्या संबंधित पोलिस अधिकारी यांच्यावर अॅट्रोसिटीनुसार कारवाई व्हावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
त्यावेळी प्रांत कार्यालयासमोर घोषणाबाजी करून घटनेचा निषेध करण्यात आला. मेहतर वाल्मीकी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. धीरज लालबीगे, आनंद लालबिगे, अजय लालबिगे, संजय मुलतानी, गोपाल वाल्मीकी, प्रदीप लालबिगे, योगेश लालबिगे, धर्मेंद्र कांगडा, मुकेश वाघेला, बलवंत झुंज, परवेश बागडे, आतिश लालबिगे, साजन लालबीगे, नीलेश बागडे, रणधीर लोहाट, ओमकार देवकाते, आकाश वाडिले आदी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव