बारामती, २६ सप्टेंबर २०२०: बारामती मध्ये आज मराठा समाजाच्या आरक्षणाला मिळालेल्या स्थागतीच्या विरोधात ‘ ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आलं. शनिवार दि २६ सकाळी आठ वाजता भिगवण रोड वरील पीएनजी चौकातून मराठा समाज मोठ्या संख्येनं एकत्र आला होता. यावेळी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायजर चा वापर करण्यात आला.
यावेळी आंदोलक भगवा झेंडा घेऊन व एक मराठा लाख मराठा लिहिलेली गांधी टोपी घालून आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. चौकातून आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीकडं घोषणाबाजी करत रांगेत जाताना एक मराठा लाख मराठा, आरक्षण टिकावा नाहीतर मराठा समाजाच्या खासदार, आमदार, मंत्र्यांनी राजीनामा द्या, आरक्षण आमच्या हक्काचं… नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देत नाय घेतल्या शिवाय राहत नाय अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तालुक्यातून मोठ्या संख्येनं समाज बांधव एकत्र आले होते. आंदोलकांनी हातात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश व नोकरीत निवड निश्चित करा तसेच कायद्यात टिकणारे आरक्षण द्या असं बॅनर हातात घेतलं होतं. आंदोलकांनी सहयोग सोसायटीच्या समोर पवार यांच्या निवास्थानासमोर घोषणाबाजी करत ढोल वाजवत आंदोलन केलं.
जवळपास एक तास आंदोलक येथे ठिय्या मांडून बसले होते. यावेळी सोशल डिस्टन्सचा वापर करण्यात आला. आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना मागण्याचं निवेदन देण्यात आलं. यानंतर पोलिसानी आंदोलकांना याब्यात घेतलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव