सोलापूर, १ नोव्हेंबर २०२३ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला आठ दिवस होऊन गेले आहेत. एकीकडे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असताना दुसरीकडे त्यांना पाठिंबा देणारे आंदोलन आक्रमक होताना दिसत आहेत. राज्यात जाळपोळ, एसटी वर दगडफेक, महामार्ग बंद करणे, आत्महत्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही आरक्षण मागणीचा आंदोलनाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या टीमसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस आणि महसूल यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना आशीर्वाद यांनी केल्या आहेत. तसेच कुठेही हिंसक वळण लागू नये म्हणून आंदोलकांसोबत समन्वय ठेवण्याच्या सूचना पोलीस व महसूल यंत्रणेला करण्यात आल्या आहेत.
सोलापूर पुणे महामार्गावर दोन एसटीवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर बार्शी तालुक्यात एकाने आरक्षणासाठी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली, परंतु त्याला वेळेवर उपचारासाठी दाखल केल्याने त्या संबंधित युवकाची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : दगडू कांबळे