रेल्वे, लष्कर अन् केंद्राच्या अखत्यारितील रुग्णालये उपलब्ध करून द्या

मुंबई, दि. ६ मे २०२०: राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे त्याबरोबरच राज्यात रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे. या वाढत्या रुग्णांना पर्याप्त सेवा मिळावी यासाठी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध होण्यासाठी रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये व संस्थांना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विनंती केली आहे.

राज्यात इतरत्रही मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर ही सुविधा उपलब्ध करणे सुरू झाले आहे. तसेच राज्यात खासगी रुग्णालये व मोठ्या संस्थांच्या जागाही आयसीयू बेड्ससाठी उपलब्ध होत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आता राज्याराज्यातून महाराष्ट्रातले नागरिक यायला सुरुवात झाली आहे. परदेशातूनही नागरिक परतायला सुरुवात होणार आहे. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज लागणार आहेत. इतर वैद्यकीय सुविधाही लागतील हे गृहीत धरून शासनाचे नियोजन झाले असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

२५,००० खाजगी डॉक्टरांना सक्तीने हजर राहण्याचे आदेश:

आजपासून मुंबईतील २५,००० खाजगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयात काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात सरकारने तसे पत्र आणि फॉर्म खाजगी डॉक्टरांना पाठवले आहेत. तसेच सेवा न देणाऱ्या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याचे अधिकारही सरकारकडे आहेत. त्यामुळे आता खाजगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा द्यावीच लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा