नवी दिल्ली: देशभरात दररोज करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५६० पर्यंत पोहोचली आहे.याच दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जनतेशी थेट संवाद साधला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी मोठी घोषणा करत आज रात्री १२ वाजल्यापासून १४ एप्रिलपर्यत २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन केले जाणार आहे. याच बरोबर जागतिक महामारी असलेल्या करोनाशी लढण्यासाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मोदी म्हणाले, करोना विषाणग्रस्तांची चाचणी करण्यासाठीच्या सुविधा, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे प्रशिक्षण या बाबींसाठी १५ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
काल मोदी काय म्हणाले
१) आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाउन.
२) पुढील २१ दिवस हा लॉकडाउन असेल. यादरम्यान घऱातून बाहेर पडण्यावर पूर्ण बंदी असणार आहे. जिथे आहात तिथेच थांबा.
३) करोनाशी लढा देण्यासाठी सोशल डिन्स्टन्सिंग हा एकमेक पर्याय आहे.
४) लोकांना सोशल डिन्स्टन्सिंग फक्त रुग्णांसाठी आहे असं वाटत आहे. पण हे चुकीचं आहे. कुटुंबातील प्रत्येकाला हे लागू आहे. पंतप्रधानांही लागू आहे. एक चुकीचा विचार तुमच्या कुटुंबातील, मित्रांना आणि संपूर्ण देशाला धोक्यात घालत आहे.
५) करोनाची लागण झालेली एक व्यक्ती फक्त आठवडा आणि १० दिवसांत शेकडो लोकांपर्यत हा आजार पोहोचवू शकते. आगीप्रमाणे हा आजार पसरतो.
६) घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नका.
७) काही देशांनी करोनावर नियंत्रण मिळवलं आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. या देशातील नागरिक अनेक आठवडे घराबाहेर पडले नाहीत. या नागरिकांनी सर्व सूचनांचं पालन केलं. आपल्या समोरही फक्त हा एकच मार्ग आहे.
८) घरातून बाहेर निघायचं नाही. काहीही झालं तरी घरात राहायचं आहे. पंतप्रधान ते गावातील छोट्या नागरिकांपर्यंत प्रत्येकाने सोशल डिन्स्टन्सिंग पाळलं पाहिजे. करोनाची साखळी तोडायची आहे.
९) जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होईल यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
१०) घरात असताना त्या लोकांचा विचार करा जे आपलं कर्तव्य निभावताना स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहेत.
११) करोनाशी लढण्यासाठी १५ हजार कोटींची तरतूद
१२) २१ दिवसांचा लॉकडाउन मोठा कार्यकाळ आहे. पण तुमच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचं असून हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक भारतीय याचा सामना करेल आणि विजय प्राप्त करेल याची खात्री आहे.
१३) आपली आणि आपल्या लोकांची काळजी घ्या. कायद्याचं पालन करा. विजयाचा संकल्प करत ही बंधने स्विकारा
१४) हे २१ दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून जर आपण योग्य पालन केलं नाही तर आपण २१ वर्ष मागे ढकलले जाऊ
१५) अनेक अफवा अशावेळी पसरतात. कृपया कोणतीही अफवा पसरवू नका आणि त्यापासून सावध राहा. राज्य सरकार, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. तुमचा जीव धोक्यात घालू नका. प्रत्येक नागरिक नियमांचे पालन करेल अशी अपेक्षा आहे.