पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी

छतरपूर, २४ जानेवारी २०२३ : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले शास्त्री यांचे चुलत भाऊ लोकेश गर्ग यांच्या मोबाईल क्रमांकावर धमकीचा कॉल आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे रामकथा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वर धाम पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा चुलत भाऊ लोकेश गर्ग यांनी जिल्ह्यातील बामिठा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोकेश गर्ग यांनाच हा फोन आला होता. ते म्हणाले की, फोन करणार्‍याने प्रथम त्यांना धीरेंद्र शास्त्री यांच्याशी बोलायचे म्हणून सांगितले. परंतू नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

छतरपूरचे पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी या प्रकरणाची नोंद झाल्याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, छतरपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फोन कॉल करणाऱ्या आरोपीचे नाव अमरसिंह असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपी अमर सिंह याच्याविरुद्ध भामिठा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६, ५०७ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल.

  • गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मध्य प्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तपासाची जबाबदारी सायबर सेलवर सोपविण्यात आली आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा