नवी दिल्ली, ८ सप्टेंबर २०२०: भारतात सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र भारतात पब्जी हा खेळ पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पबजी गेमची निर्मिती करणार्या दक्षिण कोरियन कंपनी ब्लूहोलने चीनी कंपनी टेंन्सेन्ट गेम्सशी केलेला आपला फ्रँचायझीचा करार संपुष्टात आणला आहे.
कोरियाच्या ब्लूहोलने कंपनीने भारतातील पबजी गेमची फ्रेंचायझी चीनच्या टेंन्सेन्ट गेम्सला दिली होती, जी मागे घेण्यात आली आहे. पबजी कॉर्पोरेशन आता भारतातील खेळाच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतःच हाताळेल. पब कॉर्प हा दक्षिण कोरियन कंपनी ब्ल्यूहोलचा भाग आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर, पब्जी भारतात पुन्हा सुरु होऊ शकतो.
यासंदर्भात, पीयूबीजी कॉर्पोरेशनने आपले स्पष्टीकरण दिले आहे. ”ब्लूहोलला संपूर्ण प्रकरणाची जाणीव असून खेळावरील बंदीच्या कारणांचा शोध घेत आहे. ब्लुहोलने चीनच्या टेंन्सेन्ट गेम्समधून भारतासाठी केलेला आपला करार रद्द केला आहे. त्यामुळे भारतातील पबजी मोबाइल गेमचे नियंत्रण यापुढे टेंन्सेन्टच्या ताब्यात राहणार नाही. त्याचबरोबर भारतातील या खेळाची संपूर्ण जबाबदारी पीयूबीजी कॉर्पोरेशनचीच असेल. ब्लूहोल कंपनी भारतीय केंद्र सरकारने पबजीबाबत घेतलेल्या निर्णयांचा आदर करते. तसेच, वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवणे ही कंपनीची सर्वात मोठी जबाबदारी आहे.
ब्लुहोल कंपनीला भारत सरकारच्या सहकार्याने भारतातील पबजी खेळाडूंसाठी हा खेळ पुन्हा सुरू करायचा आहे. त्यासाठी कंपनी भारतीय नियमांनुसार खेळ चालवणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे