पुरंदर मधील सासवडमध्ये आजपासून पुन्हा जनता कर्फ्यू

पुरंदर, दि. ३ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर सासवड शहरामध्ये पुढील आठ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय सासवड नगरपरिषदेच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे आज रात्री ९ वाजले पासून आठ दिवस सासवड शहर पूर्णपणे बंद असणार आहे.

सासवडसह पुरंदर तालुक्यात गेल्या बारा दिवसात संसर्गाचा वेग जिल्ह्यात जास्त वाढला आहे. पाच दिवसांपूर्वी सकाळी सासवड मधील कोरोना रुग्ण संख्या ३१ होती ती आज ६९ वर पोचली आहे. अल्पावधीतच सासवड मध्ये ३८ रुग्ण वाढले आहेत. तालुका या दिवसात ५० वरुन ९८ वर गेला. आजच्या पाॅझीटिव्ह ११ पैकी ८ रुग्ण सासवडचे व तीन नजिकच्या गावातील रुग्ण आहेत.

सासवड व परिसरात कोरोना रोखण्यासाठी वेगळी उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी लोकांकडून होत होती. कोरोनाबाधित पुण्याला सासवड अगदी जवळ आहे. त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पुणे कनेक्शनमधून सासवड व परिसरातील संसर्ग वाढत आहे. त्यामुळे पुणे व बाहेर ये – जा करणारे काम उरकून आल्यावर ‘होम क्वारंटाइन’ न राहिल्यास सासवड शहरातील परिस्थितीत फरक पडू शकत नाही, असे जाणकारांकडून स्पष्ट करण्यात येत होते. काही जाणकारांकडून साखळी तोडण्यासाठी पूर्ण  लाॅकडाउन दहा ते पंधरा दिवसांसाठी सुचविला होता. आज सकाळपासूनच लोकांकडून सासवड पूर्णपणे बंद करण्याबाबत मागणी करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर सासवड नगरपरिषदेने पुढील आठ दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या काळामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा म्हणजेच दवाखाने मेडिकल तसेच पॅथॉलॉजी लॅब सुरू असणार आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सकाळी घरपोच विकले जाणार. त्याबरोबर भाजीपाला, तरकारी घरपोच दिले जाणार आहे. त्यामुळे सासवड शहराला आता पुन्हा एकदा जनता कर्फ्यूला सामोरे जावे लागणार आहे. सासवडमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्या मुळे आता दहा दिवसातच सासवड पुन्हा जनता कर्फ्यूला सामोरे जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा