पुणे : जिल्ह्यात १९ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत शून्य ते पाच वयोगटातील ५ लाख ६८ हजार ८३० बालकांना प्रतिबंधक लस देण्यात येणार असून मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी,’ अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी केली.
जिल्हाधिकारी राम यांनी पोलीओ लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए.बी. नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले की, राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे जिल्हयात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हयात ३ हजार ९५१ बूथच्या माध्यमातून ५ लाख ६८ हजार ८३९ बालकांना पोलिओ प्रतिबंध लस देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जी बालके लसीकरणासाठी बुथवर उपस्थित राहणार नाहीत अशा बालकांना एक दिवसाच्या विश्रांतीनंतर ग्रामीण भागात पुढील तीन दिवस तर शहरी भागात पुढील पाच दिवस पोलीओ लसीकरण करण्यात येणार आहे.
जिल्हयात एकही बालक लसीकरणापासून वंचीत राहू नये, यासाठी बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजार, यात्रा, धार्मिक स्थळे, खाजगी दवाखाने या ठिकाणी बुथ व मोबाईल टिमव्दारे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून सर्व मिळून पोलीओ लसीकरण मोहीम यशस्वी करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.