‘अभ्यासिका’ नियमावलीची गरज विद्यार्थी आणि रहिवासी यांच्या हितासाठी!
पुणे हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक मोठे केंद्र बनले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) सह विविध स्पर्धा परीक्षांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी पुण्यात येत असतात आणि विविध अभ्यासिकांमध्ये अभ्यास करतात. मात्र, शहरात वाढत असलेल्या अनधिकृत अभ्यासिका आणि पेइंग गेस्ट निवासस्थानांमुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पुणे महापालिकेकडे दाखल झाल्या होत्या.
या तक्रारींची गंभीर दखल घेत पुणे महापालिका आता कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी नुकतीच यासंबंधी महत्त्वाची बैठक घेतली. यात अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, परिमंडळ पाचचे उपायुक्त निखिल मोरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत त्वरित कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. अनधिकृत अभ्यासिकांवर तातडीने कारवाई करण्याबरोबरच, मिळकत कर विभागामार्फत शहरातील सर्व अनधिकृत अभ्यासिका आणि पेइंग गेस्ट (PG) असलेल्या ठिकाणांचे व्यापक सर्वेक्षण केले जाणार आहे.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर, महापालिकेकडून या अभ्यासिका आणि पेइंग गेस्ट निवासस्थानांसाठी एक स्वतंत्र नियमावली तयार केली जाईल. या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या गरजा आणि स्थानिक रहिवाशांचे हित या दोन्हीचा समन्वय साधला जाईल.
महापालिकेच्या या निर्णयामुळे बेकायदेशीर पद्धतीने चालणाऱ्या अभ्यासिका आणि पीजी धारकांना मोठा धक्का बसणार आहे, तर नियमांचे पालन करणाऱ्या संस्थांना आणि रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































