Pune District Collector Office: पुणे जिल्ह्याच्या प्रशासकीय क्षमतेत लवकरच मोठी वाढ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव जरी फेटाळला असला, तरी मोठ्या जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामांचे विभाजन करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार, पुणे जिल्ह्यात दोन नवे अतिरिक्त जिल्हाधिकारी लवकरच रुजू होणार आहेत. विभागीय आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात एक अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यरत आहेत. नव्या प्रस्तावानुसार बारामती आणि आंबेगाव येथे प्रत्येकी एक नवे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. बारामती येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे बारामती, दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्यांची जबाबदारी असेल, तर आंबेगाव येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तीन तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि महसूल विषयक कामांचा वाढता व्याप लक्षात घेता, नव्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय कामांना गती मिळेल आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या प्रस्तावातून ही माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्त करण्याची विनंती केली आहे. विभागीय आयुक्तांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात नऊ उपविभागीय अधिकारी आणि सोळा तहसीलदार कार्यालये आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पुनर्वसन शाखा, कुळकायदा, महसूल आणि अपील शाखा यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी असते. नव्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे या विभागांच्या कामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
राज्य सरकारने नुकतीच उपजिल्हाधिकारी ते अतिरिक्त जिल्हाधिकारी अशी पदोन्नती देत ८० अधिकाऱ्यांना अशी श्रेणी दिली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना आता पदस्थापना द्यावी लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे