पुणे, १३ डिसेंबर २०२२ :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीने आज, मंगळवारी ‘पुणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. व्यापारी संघटना, आडत व्यापारी, गणेशोत्सव मंडळांनीदेखील या बंदला पाठिंबा दिला आहे.
आज सकाळी साडेनऊ वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे मुकमोर्चाची सांगता जाहीर सभेने होणार आहे. दरम्यान, या मोर्चामुळे लक्ष्मी रस्त्यासह मध्यभागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेसाठी ७,५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
- काय बंद राहणार काय चालू ?
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने पुणे जिल्ह्यातील इंधन पंप आज सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. अहवालानुसार, किराणा, बेकरी आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहतील आणि नंतर दुपारी ३ वाजेपर्यंत बंद पाळतील. बंद दरम्यान वैद्यकीय दुकाने सुरू राहणार आहेत. तर पुणे बंदला पाठिंबा देण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत.
बंद असणारे रस्ते:
- लक्ष्मी रस्ता : सोन्या मारुती चौक ते टिळक चौक या दरम्यान लक्ष्मी रस्ता सकाळी नऊपासून बंद राहील. मोर्चा पुढे सरकला की वाहतूक सुरू होईल.
- शिवाजी रस्ता : स. गो. बर्वे चौक ते बेलबाग चौक.
- बाजीराव रस्ता : पुरम चौक ते अप्पा बळवंत चौक.
- गणेश रस्ता : फडके हौद ते जिजामाता चौक.
- केळकर रस्ता : अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक.
- नो पार्किंग : बेलबाग चौक ते टिळक चौकादरम्यान वाहने लावण्यास बंदी असणार आहे.
- तर टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता सुरू राहणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.