पुण्यातील भिडे पूल दिवाळीनंतर पुन्हा बंद; वाहतूक कोंडी कायम

पुण्यातील भिडे पूल काही महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असून, तो दिवाळीनिमित्त पुन्हा सुरू करण्यात आला होता. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, दिवाळीनंतर काल (शुक्रवार) पुन्हा हा पूल बंद करण्यात आल्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी कायम राहणार आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) कडून बाबाराव भिडे पुलावर पादचारी पूल बांधण्याचे काम सुरू असल्याने, दिवाळीच्या काळात तात्पुरता खुला करण्यात आलेला हा पूल आता पुन्हा बंद करण्यात आला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याने, पुल नव्या वर्षातच नागरिकांसाठी खुला होईल, असे दिसते.

महामेट्रो डेक्कन स्थानकाला नारायण पेठ परिसराशी जोडण्यासाठी मुठा नदीवर भिडे पुलाच्या वरच्या बाजूला एक पादचारी पूल बांधत आहे. या कामामुळे गेल्या काही महिन्यांपासून पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. नारायण पेठेतून डेक्कन जिमखान्याकडे किंवा नदीपात्रातील रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना आता लांबचा वळसा घ्यावा लागत आहे.

दिवाळीच्या काळात लक्ष्मी रस्ता आणि मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन, पुलावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. ही मागणी पूर्ण करत, शनिवारी (११ ऑक्टोबर) सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, शुक्रवार (२४ ऑक्टोबर) सकाळपासून बाबाराव भिडे पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

महामेट्रोच्या म्हणण्यानुसार, या पादचारी पुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात अवजड लोखंडाचा वापर होत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पूल बंद ठेवणे आवश्यक आहे. हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना नव्या वर्षातच या पुलावरून प्रवास करता येईल.

भिडे पूल बंद असताना पुणेकर संभाजी पूल, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पूल आणि काकासाहेब गाडगीळ पूल या पूलांचा प्रवासासाठी वापर करू शकतात. सप्टेंबरपासून सुरू असलेले हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मेट्रो प्रशासनाचा विचार असून, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहान केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील