मराठवाड्यासह सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्तांसाठी अलविरा मोशन एन्टरटेनमेंटच्या वतीने कशिश सोशल फाउंडेशनच्या आयोजनात ‘पुणे चॅरिटी क्रिकेट लीग’ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ, डॉक्टर, सीए, पत्रकार, महापालिका अधिकारी, पोलिस, IT कर्मचारी इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले. स्पर्धेचे ब्रँड अँबेसेडर माजी एसीपी भानुप्रताप बर्गे होते.
अतिवृष्टीमुळे धाराशिव, सोलापूर, मराठवाडा, नांदेड अशा भागात जीवित आणि वित्तहानी झाली असून, अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. या परिस्थितीत पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी लीगचे आयोजन करण्यात आले. विजेतेपद एमआरबी आर्टिस्ट आर्मी ने पटकावले, तर उपविजेतेपद श्री गजानन 24 कॅरेट संघाने मिळवले.
अलविरा मोशन एन्टरटेनमेंटच्या दीपाली कांबळे म्हणाल्या, “पुरग्रस्तांची मदत करण्याऐवजी सेवा म्हणून काम करणे महत्त्वाचे आहे. आज वेळ त्यांच्या पाठीशी आहे, उद्या आपल्यावर असेल. ही क्रिकेट लीग माध्यमातून लोकांपर्यंत पुरग्रस्तांची परिस्थिती पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार म्हणाले, “महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेच्या ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आला, ज्यात कपडे, पुस्तके, खेळणी, सॅनिटरी पॅड आणि पादत्राणे गोळा करून एमसीए कडे सुपूर्त केले जातील.”
संकेत शिंदे, स्मिता मधुकर, अर्चना माघाडे, पूर्णिमा लुणावत, समीर गाडगीळ, ओंकार जाधव, आनंद खुडे, सौरभ पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी वैभव वाईकर













































